बाळकृष्णाच्या दर्शनास त्या शंकर आले गोकुळासी
गंगा वाहते जटांतून त्या, माळा शोभते सर्पाची
व्याघ्राम्बर परिधान करुनि भस्म विलेपी अंगासी
आणिक तिसरा डोळा भाळी, उठून भरला नजरेसी
डम डम डम डम, डमरू वाजे, नाद त्रिभुवनी घुमलासी ,
कोण असले नंदाघरीं आले, जमले तेथ गोकुळवासी
रुद्राचा तो वेष पाहुनी, भय जाहले मातांशी
आलीच यशोदा ताट घेऊनि, मोत्यांचे ते भरलेशी
जय जय जोगी, जय जय जोगी, करते पद्स्पर्शासी
भिक्षा घ्या हो, भिक्षा घ्या हो सांगतसे शिव सांबाशी
जंगलातले आम्ही जोगी, काय करावी माया ती
या मायेच्या मोहापायी, भले भले भरकटलेसी
पुत्र तुमचा घेऊन या हो, हीच ईच्छा ह्या मानसी
दूर देशीहून इथवर आलो, दर्शव आता पुत्रासी
दर्शन करुनि तृप्त होऊ मग, मनी हाच जडला ध्यासी
तृप्त होऊनि, मागे फिरुनी, जाऊ वनात परतीशी
कृपा करुनि भिक्षा ध्या हो, शंकित यशोदा विनविसी
अद्भुत रूप तुजलागीं पाहता, बाळ भयभीत झालासी
सांब तेथे समजावे मातेला, व्यर्थ शंका तव मानसी
चौदा भुवनी यासम हाचि, नसे तोल त्या शक्तीशी
मायबाप भगवान आमुचे, आणशी आता शीघ्रेशी
धीट होऊनि मैया यशोदा, आणी नंद कुमारासी
वंदन करुनि कृष्ण हासे तो, शिव ते नाचती हर्षेसी
डमरूचा खुळखुळा वाजे तो, वाजवी शंकर स्वयेशी
खिदळून हसे बाळ कृष्ण तो,शंकर भरून पावलेशी
अद्भुत काय हे घडले पळभर, काळही स्तब्ध झालासी
बाळकृष्णाच्या दर्शनास त्या शंकर आले गोकुळासी
बाळकृष्णाच्या दर्शनास त्या शंकर आले गोकुळासी
-जिज्ञेश कर्णिक
२७-०८-२०२१
पाडव्याला असे काय नवीन झाले होते
त्याच जिण्यात फक्त पंचांग नवे आले होते
तेच पक्षी तोच वारा, त्याच नभात तोच तारा
त्याच त्या झाडांवर, तेच गुलाब लटकले होते
तोच तांब्या, तीच काठी, तेच उपरणे त्याच गाठी
त्याच आंब्याचे, तेच ते पान इवले होते
पण गुढी आकार घेताना, अन गगनाशी त्या भिडताना
तेच जुने मन मात्रं नव्याने उभारले होते
असोत सर्व जुने पुराणे, पण नव्या आशा नवे तराणे
गुपित हे पाडव्याचे, मला नव्याने कळले होते.
--जिज्ञेश कर्णिक
गुढीपाडवा -२०२२